आई
प्रिय आई,
सात सप्टेंबर 2024 ला तुला जाऊन पन्नास वर्षे झाली. असा एकही दिवस नाही की तुझी आठवण आली नाही. भाऊने तुझ्याबद्दल आणि तुझ्या शेवटच्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या, त्यानंतर ही मला म्हणाली, की तुम्ही आपल्या आठवणी जरूर लिहून सगळ्यांना सांगा.
सुरुवात कुठून करावी आणि पुढे कसे जावे, हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जुनी आठवण म्हणजे मालाडला खिडकीत भाऊचे दप्तर अडकवण्याच्या नादात पडून मला पायाला झालेल्या जखमा आणि त्यावर तू खंबीरपणे मला डॉक्टर कडे नेऊन नंतर घेतलेली काळजी. त्यानंतर जोगेश्वरीच्या बिल्डिंग मधील शेजाऱ्यांकडून तू शिकलेले सिंधी प्रकार पदार्थ. तिथे ऐकलेली ओम जगदीश हरे ही आरती. आंबोलीला असताना तू मला पायी मॉन्टेसरीला घेऊन जायचीस तेव्हाचे रेल्वे क्रॉसिंग. नशिराबादला असताना मला होणारा उन्हाळ्यांचा त्रास आणि त्याची काळजी. लहानपणी हट्टीपणा केल्यावर हात पकडून चटका देऊ का अशी धमकवणारी तू.
कुसुम आत्या किंवा नाना काकाच्या लग्नात खूप खेळल्यावर माझे पाय दुखू लागले तेव्हा कार्यालयात माझ्या पायांना रॉकेल चोळणारी तू. होस्टेलमध्ये भूक लागली तर काही पौष्टिक खायला असावे म्हणून डिंकाच्या लाडू चे मिश्रण पावडर स्वरूपात माझ्या बरोबर बांधून देणारी तू.
सतीश च्या मुंजी नंतर आपण केलेला पनवेल ते महाड हा रात्रीचा बसचा प्रवास ज्यात मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो. माझे टॉन्सिलचे ऑपरेशन झाल्यावर तू मला घ्यायला पलूस ला आली होतीस आणि आपण व्हाया सातारा महाडला केलेला प्रवास. साताऱ्याला तुझ्या मामांची भेट हे सर्व अजूनही आत्ताच घडल्यासारखे वाटते. एकदा आपण ओगलेवाडीला आधी ओगलेंचा काच कारखाना पाहून त्यांच्या घरी गेलो आणि नंतर तुझी मावशी जी तेथे रहात असे तिच्या कडे गेलो होतो. तेव्हा सर्वत्र संगम सिनेमाची गाणी कर्णकर्कश पणे लागलेली असत. नंतर तुझा मावस भाऊ, नंदू केतकर आपल्याकडे हिललाईन पोलीस स्टेशन आणि ठाणे येथे येत असे. माई जतकरांनी पार्ले येथे घर बांधल्यावर आपण बऱ्याच वेळा त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरापासून रेल्वे स्टेशनला यायसाठी रेल्वे लाईन सोबत पायी जावे लागत असे. एकदा आपण ठाण्याहून माईंना भेटायला गेलो होतो. परत येताना त्यांनी आपल्याला लोकलच्या फर्स्ट क्लास मधून दादरला सोडले. दादर हून तिकीट घेतले नव्हते आणि ठाणे स्टेशनवर आपल्याला टीटीने अडवले. आमच्याकडे आमचे रेल्वे पास होते. ती परिस्थिती तू खंबीरपणे हाताळली होतीस. तुला ताजे अंजीर खूप आवडत असत, पुणे महाड आणि पुणे सांगली या प्रवासात आपण शिरूरला हमखास अंजीर घेत असू. आपण सांगलीत असताना तू रोज संध्याकाळी आजीकडे जात असे. तेथून तू मामी आणि मावशी बरोबर भाजी घेऊन येत असे. आजीच्या पायरीवर बसून तुम्ही सगळ्या गप्पा मारत भाज्या निवडत असा. आम्ही नातवंडे पण संध्याकाळी हमखास आजीकडे येत असू. मनमोकळे पणाने चेष्टा विनोद होत. तेथून आपण पायी आपल्या राधाकृष्ण वसाहतीतील घरी येत असू. आठच्या भोंग्या आधी सर्वांनी घरी यावे ही तुझी शिस्त होती.
सहा भावंडात तू चौथी, आणि त्या व्यतिरिक्त तुमच्या घरात आते भावंडं आणि कोकणातून आलेले विद्यार्थी असा मोठा परिवार होता. त्यामुळे तुझ्या स्वभावात सहनशीलता आणि असेल त्यात गोड मानणं आपोआपच आले असावे. हसतमुख राहणे आणि चेष्टा विनोद करणे हा तुझा स्थायीभाव होता. आजूबाजूच्या लोकांशी तुलना करणे हे तुला कधीच जमलं नाही. आपल्याकडे डनलॉपची गादी किंवा ड्रेसिंग टेबल नाही याचे तुला कधीच दुःख झाले नाही. सगळ्या नातेवाईकात आपल्याकडे कमी दागिने असल्याचे दुःखही नव्हते. आपला नवरा प्रामाणिक आणि निर्व्यसनी आहे आणि मुले हुशार आहेत यातच तुझा आनंद होता.
तुमच्या पीढीत लहान भावंडांनी मोठ्या भावंडांना मान द्यावा अशी अपेक्षा असे. ताई, भाऊ, दादा, अण्णा अशी विशेषणे अपेक्षित होती. त्याप्रमाणे तू सुद्धा मी हेमंतला भाऊ आणि सुरेशला अण्णा म्हणावे असा कायम हट्ट केलास. पण मोठ्यांनी लहानांशी कसे वागावे याबाबतीत काहीच अपेक्षा ठेवल्या नाहीत. तुम्ही दोघांनी मोठ्या मुलांना प्राधान्य दिले आणि माझ्यावर कामं टाकत गेलात. आपण भर उन्हाळ्यात चंद्रपूर येथे गेलो होतो. कडक उन्हात बाहेर जाऊन कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम वगैरे आणायचे काम कायम मलाच सांगितले गेले. त्या दोघांना ही कामे कधीच करावी लागली नाहीत. मिरज मिशन हॉस्पिटल मध्ये तुला स्पेशल रूम मध्ये ऍडमिट केले होते, तेव्हा देखील तू भाऊ आणि सुरेश यांची सोय पाहिलीस. त्यांना संध्याकाळी मित्रांबरोबर वेळ घालवायला जमावे यादृष्टीने माझी ड्युटी तुझे रात्रीचे जेवण आणून रात्री तुझ्या सोबत झोपायची लावली. कधीतरी मला सुद्धा मित्रांबरोबर वेळ घालवायला मिळावा असे कोणालाच वाटले नाही. मला कायम मीना मावशीचे बोलणे आठवते की नकटं व्हावे पण धाकटं होऊ नये.
तू एक धीट व्यक्ती होतीस. लहान मुलांना घेऊन तू दिल्ली ते पुणे प्रवास रेल्वेने केला, तसेच भुज हून आप्पांचे वागणे पटले नाही म्हणून एकटीनेच मुलांना घेऊन प्रवास केलास. हा तुझ्यातील प्रचंड आत्मविश्वास दाखवतो. तुला कधी भुतांची भीती वाटली नाही, की एकाट घरात राहायची भीती वाटली नाही. उलट तुला भुतांच्या गोष्टी सांगण्यात मजा यायची. आपण शिवपुरी ला असताना दादांची बदली महाडला झाली होती आणि बरेच दिवस काही खबर नसल्यामुळे तू सुरेश ला महाडला पाठविले होते. तू इंदू मावशीकडे होतीस आणि मी एकटाच घरी परतलो. दरवाज्याला ऊसाच्या तुर्यांचा पडदा होता. पडदा हटवून दार उघडून मी आत जाणार,तर पलंगांवरुन खूप साऱ्या व्यक्ती उठल्याचा मला भास झाला. मी तसाच बाहेर व्हरांड्यात येऊन बसलो. तू आल्यावर मला समजावून आत घेऊन गेलीस. आपण महाडला गेल्यावर सर्वांनी शिवपुरी च्या घराबद्दल किस्से सांगितले. दादांनी सांगितले कसे त्यांना खिडकीतून आत पाहिल्यावर पलंगावर कोणीतरी झोपले आहे असे वाटे पण टॉर्च मध्ये कोणीच नसे. दोन खोल्यांच्या मधील बाथरूम मध्ये कायम दुसऱ्या दरवाजाने कोणीतरी गेल्याचा भास होत असे.
आपण ज्या ज्या ठिकाणी राहिलो तिथे तू मैत्रिणी जमवल्यास. तुला स्वयंपाकात वेगवेगळे प्रकार करायला आवडत असे. पाटावरवंटा, खलबत्ता, जातं आणि पुरणाचे यंत्र यांच्या सहाय्याने तू साध्या कुकर मध्ये वाट्या ठेवून इडली बनवत असे. घरात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनत असत. दिवाळीत तर तीन चार प्रकारचे लाडू, शेव, चकली, चिरोटे, अनारसे, कडबोळे, चिवडा, गोड आणि खारे शंकरपाळे इत्यादी बरेच प्रकार भरपूर बनत असत. तेव्हा एकमेकांकडे फराळाला जाणे तसेच काही लोकांकडे फराळाचे ताट पाठवणे अशी पद्धत होती.
फक्त शाकाहारीच नव्हे तर तू मांसाहारी पदार्थ सुद्धा शिकून उत्तम बनवत असे. मसाले भात असो किंवा सोडे भात असो किंवा बिर्याणी असो तू ते अप्रतिम बनवत असे. बाबा तर नेहमी म्हणत की पुरणपोळी खावी तर सिंधूच्या हातची. आम्हाला घरी सोडून बाहेरगावी जाताना तू एखाद्या किलोच्या पुरणपोळ्या बनवून जात असे. त्यामुळे कित्येक दिवस आम्ही त्या पुरणपोळ्या खात असू.
आपण जळगावला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणी मिळून एकमेकांकडे पापड, कुर्डया , सालपापड्या, बनवत असा. मोठमोठे केळीचे घड आल्यावर ते पिकवणे, छपरावर केळी वाळवणे, पालेभाजी वाळवणे हे खानदेशी प्रकार तू तिथे शिकलीस.
तू सुगरण होतीस आणि स्वयंपाक ५ जणांचा असो वा ५० जणांचा, तुझा अंदाज परफेक्ट असे. कोणत्याही गोष्टीचा आळस नाही आणि कधी थकले असे म्हणाली नाहीस. कामाचं नियोजन उत्तम त्यामुळे अभ्यंकरांच्या सर्व कार्यक्रमात लता वहिनी आल्यावर सगळे निश्चिंत होत असत.
मैत्रिणींबरोबर जळगावला भजन म्हणायला सुद्धा जात होतीस. जळगावला असताना तू वेगवेगळ्या प्रकारची एम्ब्रॉयडरी करू लागलीस आणि कित्येक फ्रेम्स बनवल्यास. क्रोशा तू उत्तम करत होतीस आणि बेडशीटही बनवलीस. क्रोशा तू भाच्यांना पण शिकवलेस. पॅचवर्कने पडदेही बनवलेस. शिवणकामही तुला जमत असे, पण आपल्या घरी मशीन नसल्यामुळे, मशीन कोणाकडे तरी मागून अथवा जाऊन तू घरातल्यांचे कपडे शिवत असे. स्वेटर बनवणे फक्त तुला नीट जमले नाही, त्यामुळे ते तू ताई मावशीकडून बनवून घेतलेस.
तुला वाचनाची पण आवड होती आणि प्रत्येक ठिकाणी लायब्ररी लावून आपल्याकडे मासिके आणि पुस्तके येत असत.
तुम्हा दोघांना पत्ते आणि बाकी बैठे खेळ आवडत असत. ते तुम्ही आम्हाला शिकवलेत. महाडला असताना आपण रणदिवे यांच्या अंगणात बॅडमिंटन खेळत असू.
तुझी रास मेष तर दादांची मिथुन. हास्य विनोद होत असताना राशींवरुन एकमेकांना टोमणे मारत असा. दादांना तंबाखू खाऊन गोष्टी रंजक करून सांगायची सवय होती. त्याला तू गुळक्या टाकणं म्हणायचीस. दादांनी पाल्हाळ लावलं की त्यांना वेळ काळाचे भान रहात नसे.
तू अतिशय धार्मिक होतीस आणि बरीच व्रत वैकल्ये केलीस. सोळा सोमवारचे व्रत केले होतेस. जळगावला असताना तू निर्जल संकष्टी चतुर्थी व्रत केलेस. संकष्टी चतुर्थीला दिवसभर अन्न आणि पाणी या शिवाय तू राहात असे आणि चंद्रोदयापूर्वी आंघोळ करून 21 मोदक बनवत असे त्यातील एक मोदक मिठाचा असे. चंद्रोदय झाल्यावर नैवेद्य दाखवून तू ते मोदक एकेक करून खात असे. मिठाचा मोदक आल्यावर तुझे जेवण संपत असे. ,तुझी इच्छा असे की मीठाचा मोदक लवकर यावा. उरलेले मोदक मुलांना वाटून देत असे. असे खडतर व्रत तू केलेस. अंगणात पारिजात असल्यामुळे त्याची एक लक्ष फुले तू वाहिलीस आणि त्या नंतर चांदी चे फूल दान केलेस. आम्हा सर्व मुलांना संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोती बरोबर गणपती अथर्वशीर्ष सुद्धा म्हणायला शिकवलेस. रोज तूच पूजा करत असे आणि तेव्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणत असे. सांगलीत असताना रोज सकाळी पहाटे आंघोळ करून तू बागेतल्या गणपतीला पायी जाऊ लागलीस.तू एकटीच जातेस म्हणून अण्णा मामा तुझ्याबरोबर जाऊ लागला तो तू गेल्यावरही त्याच्या शेवटपर्यंत जात राहिला.
बुलढाणा येथे तुझ्या शेवटच्या दिवसात तुझ्याहून लहान ताई बापट यांच्याकडून तू गुरु मंत्र घेतलास. चाळीस वर्षानंतर त्या मला खामगाव येथे भेटल्या. मी तुझा मुलगा आहे असे कळल्यावर लगेच बेसनाचा लाडू आतून घेऊन आल्या आणि म्हणाल्या की तुम्हाला बेसनाचा लाडू आवडतो असे आई सांगत असे. नंतर त्यांनी हीची धाकटी बहिण सीमा हिला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कौतुकाने सांगितल्या.
तुला तिन्ही मुलांच्या आवडी माहित होत्या आणि त्याप्रमाणे तू आम्हाला शाळेत/ कॉलेजला डबा देत असे. मला तूप साखर पोळी आवडते म्हणून माझ्या डब्यात कायम एका पोळीत तूप साखर असे.
तुमच्या पिढीत कोणालाच शिक्षणाचे जास्त महत्त्व नव्हते. कशीही डिग्री मिळाली किंवा डिग्री नसली तरीही नोकरी मिळायची. त्यामुळे कॉलेजमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्याचे महत्त्व कोणालाच कळलं नाही. कॉलेजमध्ये टिवल्या बावल्या न करता अभ्यासाकडे लक्ष देण्याचे तुम्ही कधीच सांगितले नाही. लहानपणापासून तू कधी माझा अभ्यास घेतल्याचे किंवा अभ्यासाबद्दल विचारल्याचे मला आठवत नाही. दादा अधून मधून चांगला नंबर आणण्याबद्दल दरडावत असत. फक्त सांगलीत गेल्यावर मला कंपल्सरी पहाटे उठवून अभ्यासाला बसवायचे तू सुरू केलेस. भाऊचे नुकसान होऊ नये म्हणून तू त्याला अकरावीत ताई मावशीकडे सांगलीला पाठवलेस. तो तीन वर्ष ताई मावशीकडे आणि एक वर्ष कराडला होस्टेलला राहिला. सुरेश चे महाडला अकरावी झाल्यावर दादांची बदली विदर्भात झाली म्हणून मुलांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण सांगलीला बिर्हाड थाटले आणि दादा एकटेच विदर्भात गेले. हे निश्चितच कौतुकास्पद होते.
सांगलीत पहिल्या वर्षी आपण गायकवाड यांच्या घरात राहिलो. आपल्याकडे एक रूम आणि किचन असे घर होते. टॉयलेट कॉमन होते. आपले अतिरिक्त सामान गायकवाड यांच्या बंद वर्हांड्यात ठेवले होते. पुढच्या वर्षी भाऊ सांगलीला आल्यावर आपण शेजारच्या पाटील यांच्या बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये तीन खोल्या घेऊन राहू लागलो. येथेही तीन घरांना कॉमन टॉयलेट होते. वेगळे बिर्हाड आणि तीन मुलांच्या फीस यामुळे आर्थिक तंगी जाणवू लागली होती. तुझ्या बहिण भावांनी त्यावेळी बऱ्याचदा आर्थिक मदत केली. अण्णा मामा सुरेश ला घेऊन मार्केटयार्ड मधून शेंगांचे पोतं आणि गुळाची ढेप आणून देत असे.
आमच्या तिघांच्या मित्रांचे आपल्या घरी कायम स्वागत असे. आजही सर्वजण तुझी आणि तू केलेल्या पदार्थांची तारीफ आणि आठवण काढतात.
तुला मुलींची हौस होती आणि तिसरा मुलगा झाल्यामुळे तू माझे नाव ठेवायला तयार नव्हतीस. मीना मावशीनेच माझे नाव राजीव ठेवले. तुझ्या सानिध्यात आलेल्या सर्वच मुलींचे तू कौतुक आणि लाड केलेस. मग त्या मुली कानडी आहेत का मारवाडी आहेत याकडे तू दुर्लक्ष केलेस. तुझ्या तिन्ही मुलांना मुली झाल्या आणि नातवंडांना पण मुली झाल्या आहेत. त्यांना पाहून तुला खूप आनंद झाला असता.
तुझी तब्येत कायमच ठणठणीत असायची. छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी कधीच नव्हत्या. दादांना कलकत्त्याला अमिबायोसिस झाल्यानंतर त्यांना नेहमी काळजी घ्यावी लागत असे. कधी पहावं तर एन्ट्रॉव्हायाफॉर्म गोळी घेत असत. कधीच काही प्रकृतीची तक्रार नसलेल्या तुला कॅन्सर झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हा रोग संसर्गजन्य तर नाही ही शंका खूप जणांना होती. आता वैद्यकीय शास्त्रानुसार हे दुखणं स्त्रीयांसाठी अनुवांशिक आहे असे म्हणतात. मीना मावशी, ताई मावशी आणि प्रतिभा यांना हे दुखणं झाले.
तुला सिनेमा पाहायला आवडत असे, पण रोजच किंवा आठवड्यातून दोन-तीनदा सिनेमा पहावा असे कधीच वाटले नाही. जिथे दादा पोलीस स्टेशन इन्चार्ज असत तिथे आपण निश्चितच महिन्यातून दोन-तीन पिक्चर पहात असू. जळगावला दादा रिडर असताना आणि ठाण्याला आपण क्वचितच पिक्चर पाहायला जात असू. वालचंद नगरला थेटर नव्हते त्यामुळे तेथील एक वर्ष आपण एकही पिक्चर पाहिला नाही आणि नंतर सांगलीला चार वर्षात तीन-चारच पिक्चर पाहिले असतील. पूर्वी सिनेमाच्या गाण्यांची पुस्तके मिळत असत. आपल्याकडे अशी बरीच पुस्तके होती आणि तुला गाणीही पाठ होती.
तुला रेडिओवर गाणे ऐकायला आवडत असे. बुधवारची बिनाका गीतमाला तू हमखास ऐकत असे.
अण्णा मामा मला तुझा पदर म्हणून चिडवायचा तर प्रेमाने रावजी म्हणायचा. तू लाडाने मला राया म्हणायचीस. मधू काका त्या वरुन चिडवत असे की राया म्हणून सगळी कामं करून घेतेस.
मधू काका आपल्या कडे अंबरनाथ आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी बरेच दिवस राहिला, पण तू कधीच त्रागा केला नाही.
कुसुम आत्या चे लग्न झाल्यावर संक्रांत सणासाठी तू हलवा बनवून त्याचे दागिने बनवून सण साजरा केला.
सुरेश ला नोकरी लागल्यावर आपण दोघे ठाणे येथे गेलो. तेथून कळवा येथे तो ज्या खोलीत राहत होता ती पाहिली. त्या नंतर दादांजवळ हट्ट करून सुरेशला ब्लॉक भाड्याने घेण्यासाठी डिपॉझिट चे पैसे घेऊन आपण ठाणे येथे गेलो. कळवा येथील नवीन ब्लॉकला दरवाजे नसताना आपण राहिलो. दोन्ही वेळा आपल्याला कल्याणला हमालांच्या मदतीने खिडकीतून ट्रेन मध्ये चढावं लागले होते.
तसं म्हटलं तर आठवणी अनंत आहेत. फक्त एकच हूरहूर आहे की मुलांना स्थिरस्थावर झालेले तू पहायला हवे होते .
Comments
Post a Comment