मोठी आई उर्फ मालूताई माझ्या सासू बाई
मोठी आई उर्फ मालूताई माझ्या सासू बाई
आमची पहिली भेट १९७७ च्या ऑगस्टमधे नागपंचमीच्या दिवशी झाली. आमचे दादा म्हणजे माझे वडील आणि बाळासाहेब म्हणजे स्मिता चे वडील हे दोघेही पोलिस खात्यात असल्याने १९६७ पासून ओळख होती. दोघांची अकोला येथे भेट झाली आणि स्मिता बरोबर माझे लग्न व्हावे असे दोघांना वाटले. त्या साठी त्रिचीहून मला अकोला येथे येण्यास सांगितले. १५ ऑगस्ट ला जोडून सुट्टी घेऊन मी आधी मुंबई आणि तेथून अकोला येथे गेलो. मी अकोला येथे पोचण्यापूर्वी पाचपोर कुटुंब नागपूर येथे स्थलांतरित झाले होते. महाराष्ट्र एक्स्प्रेस ने मी नागपूरला निघालो. दादांनी तसे नागपूरला फोन करून बाळासाहेबांना कळवले. गाडीत एका शिपायाने अजनीला उतरुन लक्ष्मीनगरला जायला सांगितले. तसे मी उतरुन सायकल रिक्षाने घर हुडकत पोचलो. तो पर्यंत नलूमावशी आणि नीलूताई येऊन पोचल्या होत्या. मी आंघोळ करून तयार झाल्यावर बघण्याचा कार्यक्रम झाला. सीमा आणि संजूराजू पडद्याआड उभे होते.
प्रत्येक सासूला मोठ्या जावयाचे कौतुक असते. तसे ते मोठी आईला ही होते. आम्ही त्रिचीहून नागपूर ला यायचो तेव्हा आता काय करू आणि काय नको अशी अवस्था असे. कथ्था, नेव्ही ब्लू आणि बॉटल ग्रीन रंगाचे शर्ट मला चांगले दिसतील म्हणून लेटेस्ट स्टाईल चे अंदाजाने माप देऊन शर्ट शिवून घेतलेले असत. अधिक महिन्याचे वाणही ४० वर्षे न चुकता दिले. जावयासमोर वावरतानाचा संकोच जन्म भर राहिला. एरवी बोलताना मोकळे पणा होता, हक्काने काही गोष्टी अपेक्षित असायच्या पण तरीही संकोच जाणवायचा.
घराची किल्ली कुठे ठेवली हे लक्षात रहायचे नाही. एकदा तर आम्ही भरतनगरहून कारने निघालो. अर्ध्या रस्त्यावर किल्ली बरोबर नाही हे लक्षात आले. पुन्हा परत जाऊन किल्ली घेऊन लक्ष्मीनगरला गेलो. औषधांच्या बाबतीत ही विसर पडायचा. सुरुवातीला आमच्या कडे एक्स्ट्रा औषध ठेवलेले असायचे. औषध आहे का म्हणून विचारल्यावर शेखर किंवा संजूराजू ना फोन करून मागवायचे. तारखा कधीच लक्षात राहिल्या नाहीत.
ड्रॉईंग ची आवड होती आणि रांगोळी ची आवडती डिझाईन होती. भरतकाम, वीणकाम यात गती नव्हती पण शिलाईची आवड होती. मुलींच्या बाळंतपणात दुपटे, लंगोट , झबले टोपरे सगळे घरीच मशीन वर शिवले जायचे. जुन्या साड्या आणि चादरी वापरून घरीच मशीनवर गोधडी शिवायची हौस होती. नातींसाठी फ्रॉक ही खुप शिवले. आम्ही नागपूर ला आल्यावर पल्लवी मधुराच्या वेण्या हौशीने घालायची.
टापटीप, नीटनेटके रहायची आवड त्यामुळे कधीही भणभणलेली दिसली नाही. कायम प्रसन्न चेहरा, आळस कधी नाही. घर कायम आवरलेले असायचे, कुठेही पसारा नाही. कोल्डक्रिम वर्षभर लावायला आवडायचे. अंगण रोज झाडणे हा एक प्रकारे व्यायाम च होता. आम्ही नागपूर ला आल्यावर मी सकाळी ऑफिसला जाताना दिक्षाभूमी जवळ क्रॉस होत असू. कित्येक वर्षे रोज सकाळी घरापासून रामकृष्ण आश्रम पर्यंत पायी जायचा नियम होता. आम्ही रुद्रराज मध्ये रहात असताना नेमाने आश्रमातून आमच्या कडे जात असे. मी ४ वर्षे गुजरात मध्ये असताना स्मिता आणि मुलांची काळजी घेतली. नंतर मी ओरीसा आणि छत्तीसगड मध्ये असताना स्मिताला सोबत म्हणून रहायला येत होती. पण मी रिटायरमेंट घेतल्यानंतर कधीच रहायला थांबली नाही.
दागिने आणि साड्यांची प्रचंड आवड. बाळासाहेब असे पर्यंत खरेदीचीही खूप हौस केली. साडी विकत घेऊन घरी आल्यावर जर पसंत नाही पडली तर दुसऱ्या दिवशी परत बदलायला जायचा उत्साह ही होता. हिनेही दरवर्षी किमान एक साडी आईला देण्याचा नेम पाळला. त्यामुळे आम्ही कुठेही गेलो आणि साडी घेतली तर एक साडी आईसाठी पण जरूर घ्यायचो. मग ते त्रिची, चेन्नई, येवला किंवा सुरत असो.
बोलण्यात फटकळ पण समोरच्या व्यक्तीला काय वाटेल हा विचार ही मनाला शिवायचा नाही. बरे बोलताना मनातही काही नसायचे. या स्वभावाचा अनुभव सगळ्यांना आला. गोऱ्या रंगाचे आणि सुबक नाकडोळ्यांचे कौतुक होते. साधारण दिसणाऱ्यांना टेणेमेणे म्हणायचे.
नातवंडात जय आणि राधावर अधिक प्रेम. त्यांना कोणी काही बोललेले चालायचे नाही. लहानपणी एकदा राधा मोठ्या आईबरोबर आमच्या घरी आली. तेव्हा घरातल्या जिन्याला रेलींग नव्हते. राधा सारखी वर खाली करत होती आणि कोणाचेच ऐकत नव्हती. शेवटी मी तिला रागावून बाथरूम च्या माळ्यावर ठेवले तर तिकडे मोठी आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू.
काही ही नवीन केले की लोकांनी पाहून त्याचे कौतुक करावे ही अपेक्षा. मग ते घरातील अरेंजमेंट असो की नवीन पडदे असोत की देवघरातील सजावट असो. कोणी भेटायला आले आणि घरातील बदल लक्षात घेतला नाही आणि त्याचे कौतुक केले नाही तर वाईट वाटत असे.
बाळासाहेब १९८१ मधे गेल्या नंतर सुरुवातीला जेव्हा पेन्शन कमी होते आणि शेखर चा पगार ही छोटा होता, तीने कधीही त्याबाबत कुरकुर केली नाही की कोणाला ते जाणवू दिले. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या आदरातिथ्यात कुचराई केली नाही, ना कोणासमोर हात पसरला. संजूराजू लहान होते आणि टिव्ही साठी हट्ट धरला तर दागिने विकायची तयारी ही ठेवली.
सीमा च्या लग्नाच्या वेळी पण खर्च करण्यात हात सढळ ठेवला. तेव्हा नागपूर मधे लग्न व इतर कार्यात अय्या ला काम दिले जात असे. सर्व शिधा दिल्यानंतर ते स्वयंपाक करत असत. लाडू साठी बुंदी पाडून पाकात टाकून देत पण लाडू वळायचे नाहीत. लाडू वळणे हे घरच्यांचे काम होते. हे काम घरी कसे करता येईल असा प्रश्न विचारला तर कार्यालय एक दिवसा ऐवजी दोन दिवसांसाठी घेतले. अतिरिक्त खर्च करून टाकला. बाळासाहेब गेल्या पासून दोन्ही दीर क्वचितच फिरकत. त्यामुळे दादासाहेब मंगरूळकर, बाळासाहेब महाजन आणि शरदराव पारधी यांच्या वर जास्त अवलंबून निर्णय घेतले जात. नानासाहेब पाचपोर जे ताईमावशीचे यजमान होते आणि बाळासाहेबांचे काका होते त्यांना देवक बसवायला आणि कन्यादान करायला सांगितले. या सर्वाचा दीरांना राग आला. ते लग्नाला आले पण एकही काम केले नाही की काही विचारपूस केली. या सर्व प्रकारानंतर ही कोणताही आकस न बाळगला नाही आणि संबंध नंतर सौहार्दपुर्ण ठेवले.
स्वयंपाक करून मुलांना आणि नातवंडांना खाऊ घालायची हौस. आता वय झाले सोडून द्या सगळं म्हणून सांगितले तरी पटायचे नाही. बर जावयाला जेवायला बोलवायचे तर फक्त तिघांच्या साठी कधीच स्वयंपाक बनवला नाही. तो सगळ्यांसाठी बनवून गोंधळ घालायला आवडायचे त्यामुळे मी नाही म्हणायला लागलो तर तेही वाईट वाटायचे. तुम्ही येता पण काही करु देत नाही ही तक्रार कायम होती.
आश्रमातील सर्व लोकांना पुरेल इतक्या पुरणपोळी किंवा इतर पदार्थ करून घेऊन जायची हौस. पुरण वाटायचे यंत्र बिघडले, मिक्सर खराब झाला तर पुरण पाट्यावर वाटायची तयारी ही होती. बरे आता वय झाले, सुनांना बाकी व्याप असतात, असे म्हणायची चोरी. मी कोणावर अवलंबून नाही, माझी मी समर्थ आहे असे म्हणायची तयारी ही होती. स्वामीजी ही मालूताई खसखसची भाजी खायची इच्छा आहे अशी फर्माईश करायचे. मालूताई ही लगेच कामाला लागायच्या. बरे त्या नंतर डबे परत मिळाले नाहीत म्हणून आश्रमात तक्रार करायची आणि राजूचा पिच्छा पुरवायची.
आईस्क्रीम, आंबा, सीताफळ, केळी हे सर्व आवडायचे. पिकनिक, डबापार्टी हे आवडते कार्यक्रम. कारने दूरचा प्रवास करताना कधीच तक्रार नाही. चमचमीत खायला आवडायचे पण त्या नंतर कधी जळती लागली तर कधी गळती लागायची. तरीही तळकट आणि चमचमीत खाणे सोडले नाही.
चिवट कामे करण्यात कधीही कंटाळा केला नाही. फुलांच्या बाजारातून खूप फुले आणून त्यांचे भाराभर हार करण्यात आनंद होता. तसाच आनंद दरवर्षी संत्र्याच्या सीझन मध्ये संत्री सोलून त्यांचा भात बनवून सर्वांना खाऊ घालायची हौस होती.
मुले मोठी झाली आणि परीस्थिती बदलल्या वर हात खूपच मोकळा झाला. लोकांना आग्रहाने पैसे देण्यात आनंद आणि अभिमान होता. समोरची व्यक्ती वयाने लहान आहे का मोठी आहे याचा विचार कधी केला नाही.
एक प्रसन्न लोभस व्यक्तिमत्त्व आपल्याला सोडून गेले. ईश्वर त्यांना सद्गगती देवो हीच प्रार्थना.
👍🙏
ReplyDelete👍
ReplyDeleteMalutaiche खूपच छान varnnan केले aahe
ReplyDelete