पायपीट आणि वणवण
पायपीट आणि वणवण
आजच्या काळात तरुणपिढीला चालणे आवडत नाही आणि आवश्यकही राहिलेले नाही. १०० मीटर अंतरावर सुध्दा दुचाकीने जाण्याची पद्धत आहे. आम्हाला लहानपणापासून चालण्याला पर्याय नव्हता. मॉन्टेसरीत जाण्यासाठी चालत जायची लागलेली सवय ११वीत गेलो तरी चालूच होती.
बहुतांश आईवडीलही या बाबतीत उदासीन होते. घरात सायकल असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. फारच कमी मुले शाळेत सायकलने येत असत. सर्व गावात आणि शहरात टांगे चालायचे, पण मुलांना शाळेत पाठवायसाठी त्यांचा वापर नव्हता.
आमच्या घरी दादांची इंम्पोर्टेड सायकल होती. तीला पुढच्या चाकाच्या हबमध्ये डायनामो होता. ओरिजिनली गीअरची सायकल असावी कारण हँडलवर एक स्विच होते. ह्या सायकलला हात लावायची कोणालाही परवानगी नव्हती. जळगावला देशपांडे म्हणून दादांचे सहयोगी त्यांच्या सायकलवर मी सायकल चालवायला शिकलो. पुढे मी ७वीत शीवपुरी, वालचंदनगर येथे असताना आमच्या घरातील ऑर्डर्ली इमामच्या सायकलवर सीटवर बसून सायकल चालवायला शिकलो. इमामने त्याची सायकल उत्तम सजवलेली होती. सायकल चालवताना गुडघे फुटले, पोटरीला जखम झाली. सुरेशची शाळा वालचंदनगरला होती. तो दादांच्या सायकलने शाळेत जात असे. वालचंदनगरहून आम्ही महाडला बदलून गेलो. महाडला दादा सायकलने पोलीस ठाण्यात जात. महाडहून दादांची बदली चांदा( आताचे चंद्रपूर) ला झाली. आम्ही सर्व सांगलीला गेलो. दादांची सायकल सुरेशला कॉलेजला जायला मिळाली. चांद्याला दादांनी नवीन सायकल घेतली. पुढे दादांची बदली बुलडाणा जिल्ह्यात झाल्यावर मेहकर येथे दादांनी बुलेट मोटरसायकल घेतली; त्यामुळे मला कॉलेजला जाण्यासाठी ती सायकल सांगलीत आली.
घरापासून शाळा कधी जवळ तर कधी दूर. आता सारखी शाळेत पाण्याची बाटली नेण्याची पद्धत नव्हती. मिळेल ते पाणी पीत असू.
नशीराबाद आणि एरंडोल खेडीच होती, त्यामुळे शाळा जवळच होत्या. जळगावात आम्ही बळीराम पेठेत रहात होतो. जळगावला पोचल्यावर आधी नगरपालिकेच्या ६ नंबर शाळेत प्रवेश घेतला. ती जास्त दूर नव्हती. चौथीत त्याच शाळेला लागून असलेल्या खाजगी शाळेत प्रवेश घेतला.
तिथे थोडे स्थिर होत नाही तर, दादांची बदली ठाण्याला स्टेट ट्रॅफिक मधे झाली. आम्हाला कोपरी गावाजवळ क्वॉर्टर मिळाले. एकदम नवीन घर होते, पण वीज पुरवठा नव्हता. घराला लागून भातशेती असल्याने डासांची संख्या प्रचंड होती. नौपाडाच्या डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर मध्ये शाळेत प्रवेश घेतला. शाळेत जायला कोपरीहून बारा बंगला एरीया ओलांडून रेल्वे ओव्हर ब्रिज क्रॉस करावा लागे, तेव्हा ठाण्यात येत असू. हे अंतर जास्त असल्यामुळे आम्ही रेल्वेलाईन ओलांडून नौपाडा गाठत असू. परत येतानाही हीच कसरत असे. शाळे व्यतीरिक्त बाकी सर्व कामांसाठी आणि खरेदीसाठी कोपरीहून टेंभीनाक्याला किंवा नौपाडाला जावे लागत असे. दादा नेहमीच त्यांच्या स्पीडने चालत असत. पुढे दादा मग आई आणि आम्ही तिघे जवळजवळ धावत त्यांच्या मागे जात असू. या सगळ्यात कधी टांग्यात बसल्याचे आठवत नाही.
आम्ही अंबरनाथच्या शाळेत असताना प्रथम अंबरनाथ मध्ये रहात होतो. अंबरनाथच्या घराजवळून नाला वाहतअसे. त्याच्यावर ऑर्डनन्स फॅक्टरीला जाणारी रेल्वेलाईन होती. नाल्यातून धरमसी मोरारजी मिल्सचे सांडपाणी वाहत असे. कौलारू बैठे घर होते. जवळ पॉवरहाऊस होते, पण घरात वीजपुरवठा नव्हता. अंबरनाथमधे वायू प्रदूषण खूप होते. केमिकलचा वास सदैव असे. नंतर दादांची बदली हिललाईन पोलीस स्टेशन, कँम्प नंबर ५ मध्ये झाली. पोलीस स्टेशन च्या मागे टेकडी होती, ती चढली की माजी मलंग चा डोंगर दिसतो. आम्ही तेथेच रहात होतो व शेवटी ठाण्याहून रेल्वेने अंबरनाथला शाळेत गेलो.
कँम्प नंबर ५ पासून सकाळी अंबरनाथ साठी बस मिळत असे. बस सिंधी व्यापाऱ्यांनी खचाखच भरलेली असे. प्रत्येकाच्या हातात कपडे आणि खोळींनी भरलेले मोठे गाठोडे असे. अंबरनाथ स्टेशनवर उतरून १ किलोमीटर पायी शाळेत जावे लागे. परत येताना शाळा सुटल्यावर लगेच बस नसे. संध्याकाळी साडेसहाला बस असायची. बसची वाट पहात विम्को कंपनीच्या कॉलनीत भाऊचा मित्र बाश्यमच्या घरी बसायचो. तसे थांबायचा कंटाळा आला तर शाळेपासून ५ किलोमीटर पायी जावे लागे. रस्ता चढाचा होता. मेनरोड टाळल्यास झाडा झुडुपांमधून पायवाट होती. दप्तराच्या बंदाला गाठ मारून तो लहान केलेला असे, ती चोखत पायवाटेने एकदिड तास चालून घरी पोचत असे.
दादांचीबदलीठाणेसिक्युरिटीब्रँचलाझाली. ठाण्यात आम्ही चरईत अंकलेसरीया बिल्डिंग मध्ये सर्वात वरच्या मजल्यावर रहात असू. ३ घरांसाठी कॉमन संडास होते. इथे आमच्या घरात बरशेन गैस आणि प्रेशरकुकर आला. तोपर्यंत आई स्टोव्हवर स्वयंपाक करायची. शाळा बदलायला नको म्हणून आम्ही काही महिने ठाण्याहून अंबरनाथला रेल्वेने गेलो. सकाळी लवकर उठून दिड किलोमीटर पायी चालून स्टेशन गाठायचे, मग ठाण्याहून दौंड मनमाड पॅसेन्जरने अंबरनाथला जात असू. तिथून एक किलोमीटर शाळा. परत येताना इंजिन लोकलने परत येत असू. गाडीला प्रचंड गर्दी असे कारण कारखाने सुटायची वेळ असे. तेव्हा ठाण्यात टांगे चालायचे. सध्या जसे शेअर आटो असतात, तसे टांग्यात लोक जात असत पण आमच्या नशिबी पायपीटच होती.
भाऊला अकरावीसाठी सांगलीत ताई मावशीकडे ठेवले. सहावी नंतर सातवीत ठाण्यातील मो.ह. हायस्कूलमधे प्रवेश घेतला. शाळा तलावपाळी जवळ असल्याने घरापासून जास्त दूर नव्हती. काही महिने या शाळेत गेलो तर, दादा डेप्युटेशनवर MSFC(Maharashtra State Farming Corporation)मधे वालचंदनगरला गेले. पगारा व्यतिरिक्त मिळणारा डेप्युटेशन अलाऊन्स हे मुख्य कारण होते. त्यामुळे भाऊसाठी सांगलीला पाठवायच्या पैशांची सोय झाली. तिथल्या शिवपुरी कॉलनीत दवाखान्याला लागून असलेल्या घरात आम्हाला जागा मिळाली. घर बैठा कौलारू बंगला होता. घरासमोरील रस्ता ओलांडला की हातपंप होता. तिथून पाणीभरून आणण्यासाठी एक माणूस लावला होता. घराच्या मागे कालवा होता. कालव्याच्या पलिकडे साखर कारखान्यात ऊस नेण्यासाठी रेल्वे होती. त्या नंतर रस्ता व ऊसाची शेती. जवळच आईची आत्येबहिण इंदू रहायची. गंगाधरपंत अभ्यंकर तीचे यजमान होते. घराजवळील मैदान ओलांडले की माझी शाळा होती. सुरेशची शाळा वालचंदनगरला होती.
वालचंदनगरहून दादांची बदली महाडला झाली.
महाडला आम्ही बस स्टँडजवळ गावाबाहेर ओक वकीलांच्या बिल्डिंगमध्ये रहात होतो. खाली वजने-मापेचे ऑफिस आणि पहिल्या मजल्यावर आम्ही आणि गोडेसर रहात होतो. ओक वकीलांचे तेथे ३-४ बंगले होते. समोरच्या बंगल्यात रणदिवे मॅजिस्ट्रेट रहायचे. त्यांना २ मुले आणि १ मुलगी होती. शेजारच्या बंगल्यात प्राध्यापक भन्साळी रहात. त्यांना २ मुले होती. त्यांचा आमच्या वयाचा भाऊही तिथेच रहायचा. US Peace Corps मधून २ अमेरिकन मुलीही त्याच कम्पाऊंडमधे रहात. रणदिवेंच्या अंगणात बॅडमिंटन चे कोर्ट होते, तेथे आम्ही बॅडमिंटन शिकलो. रणदिवेंच्यामागे विहीर होती, तिथून कामवाल्या पाणी भरून आणत व घरातील ड्रममध्ये भरत. आमच्या घरांना लागून भाताची शेती होती. आमच्या घराजवळ मिलीटरी बॉईज हॉस्टेल होते; जिथे सैनिकांची मुले रहात. हॉस्टेल घ्या आवारात काजू ची झाडं होती आणि मोठं ग्राउंड होते. तिथे आम्ही क्रिकेट खेळत असू.
आम्ही सर्व परांजपे हायस्कूलमध्ये शिकायचो. शाळा नदी काठावर होती. मेन रोडने गावातून शाळेत जायला रस्ता होता पण तो लांब होता. घराजवळच्या एका बंगल्याच्या पलिकडे नदीकाठाने जाणारा छोटा रस्ता होता. ह्या रस्त्यावर स्मशान होते. स्मशान ओलांडून शाळेत जावे लागे. पावसाळ्या नंतर कापणी झाल्यावर शेतातून शाळा जवळ पडायची. या मार्गावरही स्मशान ओलांडावे लागे. स्मशाना जवळील शेतात मेलेली जनावरे असत आणि त्या मढ्यांच्या जवळ मोठी गिधाडे असत. जीव मुठीत धरूनच शाळेत जावे लागे. पावसाळ्यात नदीला पूर आला की रस्त्यावर पाणी येत असे. नदीतून वाहत जाणारी जनावरे दिसत.
शाळा चांगली होती आणि शिक्षकही उत्तम होते. भूमीती चांगली यावी म्हणून भातखंडे सरांकडे एका वर्गमित्राबरोबर काही दिवस गेलो.
शाळे व्यतिरिक्त इतर कामांसाठी शहरात पायीच जावे लागे. रायगड किल्ला महाड जवळ आहे. तो दादांच्या हद्दीत होता त्या मुळे बरेच वेळा गेलो. पाचाड पर्यंत बसने जाऊन पुढे पायीच जावे लागत असे. बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व पाहुण्यांना रायगड किल्ला, लोटे परशुराम आणि गुहागर येथे नेत असू. एकदा रायगड उतरायला उशीर झाला आणि शेवटची बस चुकली. महाड तिथून १४ मैल होते. दादा म्हणाले, चला चालायला लागू या. आधीच ४ मैल गड उतरून आलो होतो, सगळ्यांच्या पोटात गोळा आला. तेवढ्यात एक ट्रक आला, त्याला जीजी पाटीलने थांबवले आणि आम्ही त्यात बसून महाडला परत आलो. जीजी पाटील दादांचा रायटर कॉन्स्टेबल होता. तो सगळीकडे दादांच्या सावली सारखा असे. रामदास स्वामींची शिवथरघळ दादांच्या हद्दीत होती. तिथे ही आम्ही गेलो. सर्व भाग डोंगराळ होता, एकदा दादा पाय घसरून पडले आणि हात फ्रॅक्चर झाला. दुसऱ्यांदा पाय मुरगळला, तेव्हा जीजी पाटीलच दादांना पाठिवर घेऊन डोंगर ओलांडून आला होता.
ठाणे, वालचंदनगर आणि महाडला असताना आमच्या पुण्याला बर्याच फेर्या झाल्या. आधी मोठी आई ( दादांची आई) वारली. नंतर कुसुम आत्या आणि नाना काकाचे लग्न झाले. वालचंदनगरला आमच्या घरी अप्पा (दादांचे वडील) वारले. त्यांचे पुण्यात श्राद्ध झाले. नंतर कुमार काकाचे लग्न आणि आम्हा सहा चुलतभावांची एकत्र मुंज. या सर्वासाठी आम्ही लक्ष्मीरोड वरील ९२४, सदाशिव येथील वाघ वाड्यात रहायचो. समोर गोखले हॉल होता. घर लहानच होते पण शेजारच्या रिकाम्या घरात रहायचो. काही जण बाल्कनीत झोपत. आम्हा सर्व पुतण्यांना नानाकाका क्रिकेट खेळायला लॉ कॉलेज ग्राऊंडवर घेऊन जायचा. जाताना पायी जाताना काही वाटत नसे. परत येताना सर्वांना बसने येण्याची इच्छा असे. पण नानाकाका वेगवेगळ्या क्ल्रृप्त्या लढवून पायीच परत आणत असे.
सदाशिव पेठेतून पर्वती, पेशवेपार्क, पद्मावती या सर्व ठिकाणी पायीच जायच़ो. लक्ष्मी रोडवर शेडगे विठोबा मंदिराजवळ लागूंचा बंगला होता. पुण्यात गेल्यावर हमखास तिथे जायचो.
महाडहून आई, सुरेश आणि मी सांगलीला गेलो. राधाकृष्ण वसाहतीत आधी १ रुम, किचनचे घर घेतले. मालक समोर रहात आणि मागे भाड्याने देण्यासाठी खोल्या होत्या. कॉमन संडास होता. अतिरिक्त सामान मालकांच्या मागच्या बंद वर्हांड्यात ठेवले होते. भाऊ कराडला होता. सिटी हायस्कूलमध्ये १० वीत प्रवेश घेतला. शाळा गावभागात होती. मी आणि सुधीर पोरे शाळेत बरोबरच पायी जायचो. सुधीर आमच्या घरासमोर रहात असे. शाळेत जायचा शॉर्टकट झोपडपट्टीतून जात असे. तेव्हा बर्याच घरात पाटिचे संडास होते, त्या साठी घरामागे सर्व्हिस लेन असे. झोपडपट्टी जवळच्या सर्व्हीस लेनची त्यांनी हगणदारी करून ठेवली होती. बायका अर्वाच्य शिव्या देत असत. त्यातून आम्हाला जावे लागत असे. इकडे तिकडे पहायची सोय नसे. दुपारच्या सुट्टीत सुध्दा आम्ही घरी येत असू. एक वर्ष त्या घरात राहून आम्ही पुढल्या वर्षी शेजारच्या क्रृष्णक्रृपा बंगल्याच्या आऊटहाऊस मधे शिफ्ट झालो. ह्या घरात दोन रुम आणि स्वयंपाकघर होते. त्या काळात सर्वच घरी स्वयंपाकघरात मोरी असे जिथे अंघोळ करावी लागे. इथेही कॉमन संडास होता. भाऊ वालचंद कॉलेजमधे सेकंड ईयरसाठी आला.
आई रोज संध्याकाळी गावभागात आजीकडे जात असे. तिथून ती मावशी आणि मामी बरोबर भाजी आणायला जायची. आम्हीपण सर्व नातवंडे संध्याकाळी आजीकडे पोहचायचो. आजी पायरीवर बसलेली असे. सर्वांची टिंगल करण्यात वेळ जाई. ८ च्या भोंग्याच्या आधी घरी पोचत असू.
१९६७ च्या दिवाळीसाठी आम्ही चांद्याला गेलो. त्या काळी ठाणे आणि चांदा हे महाराष्ट्रातील मोठे जिल्हे होते. तेव्हा मिरज पुणे मीटरगेज रेल्वे होती. तिचे नाव MSM ( मैसूर सदर्न मराठा) रेल्वे होते. मिरजहून आम्ही पुण्याला पोचलो. तेव्हा मुंबई- पुणे- दौंड- मनमाड पॅसेन्जरला एक ३ टियर कोच नागपूरसाठी पुण्यात जोडत. हा कोच मनमाडला मुंबई- हावडा एक्सप्रेसला जोडत. ज्या दिवशी आम्ही गाडीत बसलो त्या दिवशी आमची ट्रेन लेट झाली आणि एक्सप्रेस आम्हाला न घेता निघून गेली. आमचा कोच भुसावळ पॅसेन्जरला जोडून आम्हाला भुसावळला नेण्यात आ. त्या वेळी दादाकाका भुसावळला रहात असे. आमचा कोच संध्याकाळी नागपूर पॅसेन्जरला जोडण्यात येणार होता, त्यामुळे वेळ भरपूर होता. काकाचे घर हुडकून आम्ही भेटलो. ते ही सर्व स्टेशनवर आले. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही वर्धा जंक्शनला पोचलो. हि आमची पहिली विदर्भ भेट. दादा आदल्या दिवशी आम्हाला घ्यायला येऊन गेले होते. स्टेशनवर कळले की आम्हाला बल्लारशाह पॅसेन्जरने जायचे आहे. ट्रेन मधून छोट्या चाकांच्या बैलगाड्या दिसल्या ज्या आधी कधी पाहिल्या नव्हत्या. नंतर कळले की त्यांना रिंगी म्हणतात. चांद्याला उतरल्यावर पहिल्यांदा सायकलरिक्षा पाहिली. त्यात बसून पोलीस स्टेशनला गेलो. दादा तिथेही नव्हते. क्वॉर्टर मागेच असल्याने शिपायांनी आम्हाला तिथे सोडले आणि दादांना निरोप पाठवला. चांद्याला तेव्हा सांबर/ हरणाच्या कातड्याचे बूट बनायचे. बरेच सारे बूटांचे जोड घेऊन आम्ही सांगलीला परत आलो. पुढच्या उन्हाळ्यातही आम्ही चांद्याला गेलो. विदर्भातील उन्हाळा कसा प्रखर असतो हे तेव्हा कळाले. क्वॉर्टरमधे फक्त एक स्टँडवाला पंखा होता. वर्हांड्यात पाणी टाकले तर वाफ व्हायची. पश्चिम महाराष्ट्रात न पाहिलेले व्हिम्टो आणि आईस्क्रीम सोडा ही थंडपेये इथली स्पेशालिटी होती. शेंडेफळ असल्याने रणरणत्या उन्हात दुकानात जाऊन कोल्ड्रिंक्स आणणे माझे काम होते. गावात उपलेटा चे मिठाई दुकान नावाजलेले होते, तेथे प्रथमच राजस्थानी मिठाई आणि नमकीन चा आस्वाद घेतला.
दादांनी एक जीप अरेंज केली जीने आम्ही वणी आणि माहूरला गेलो. जीपला कॅनव्हास चे कव्हर होते. झळा सहन करत आम्ही माहूरला पोचलो. रात्री तिथे थांबून दुसऱ्या दिवशी परत चांद्याला पोचलो. एक दिवशी जवळच्या दुर्गापुर अंडरग्राऊंड कोळशाच्या खाणीत गेलो.
चांदा जिल्ह्यात घनदाट जंगल असल्याने टिकवूड/ सागवान मिळत असे. दादांनी तीथे शिशवी लाकडाचा सोफासेट बनवून घेतला जो आमच्या घरातला पहिला सोफासेट होता. हा सोफासेट भाऊकडे आत्ता पर्यंत होता.
उन्हाळ्यात मी आणि सुरेश सांगली ला परत निघालो. नेहमी प्रमाणे पॅसेंजर लेट होती. दुपारी नगर ला पोचलो, तर प्लॅटफॉर्म वर पिण्याचे पाणी नाही. कॅन्टीन वाल्याला विचारले तर तो म्हणाला, ' वडा घेतला तर १ कप पाणी मिळेल'. इलाज नसल्याने तसेच करावं लागलं.
दादांची बदली बुलडाणा जिल्ह्यातील अमडापुरला झाली. तिथे जाण्यासाठी जलंब जंक्शनला उतरावे लागे. तेथून खामगावसाठी शटल चाले. हे शटल मजेशीर होते. वाटेत एका ठिकाणी थांबून ड्रायव्हर पंप चालू करून इंजिन मध्ये पाणी भरत असे. खामगावला पोचून अमडापुरला जायची चौकशी केली तर बसने जावे लागेल असे कळले. तेव्हा विदर्भात प्रायव्हेट बसेस चालत. पश्चिम महाराष्ट्रात फक्त ST चाले. गजानन ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये बसलो तर कंडक्टरची अरेरावी सुरु. पोलिसवाले आहोत कळल्यावर आम्हाला VIP ट्रिटमेंट मिळाली. क्वॉर्टर खूप जुने होते. झाडताना आईच्या पायाशी काय दिसते म्हटल्यावर, विंचू होता. आयुष्यात पहिल्यांदाच विंचू पाहिला. गाव खूपच छोटे आणि काहीच मिळत नव्हते. इथेच पंढरीनाथ मुंढे दादांचा रायटर कॉन्स्टेबल होता. त्याच्या बरोबर मी चिखली रोडवर सायकल चालवत असे. आम्ही तिथे असतानाच दादांची बदली मेहकरला झाली.
मेहकर हे टेकड्यांवर वसलेले गाव आहे. क्वॉर्टर रिकामे नव्हते म्हणून इरिगेशनचा रिकामा बंगला आम्हाला मिळाला. बाजूला बंधारा होता ज्याला अनिकट म्हणत. बंगल्यातून मेनरोडवर जायचा रस्ता खूप चढणीचा होता. वर पोचल्यावर एका पुरातन कालीन इमारतीचे भग्न अवशेष होते. मेहकरला जाणाऱ्या प्रत्येक गाडीला कठीण चढ चढून जावे लागे. त्यांच्या गीअर बदलण्याचे आवाज ऐकू येत. मेनरोड वळसा घेऊन जात असे. बंगल्यापासून एक छोटा रस्ता सरळ गावात जात असे. या रस्त्याने कामासाठी लोक येत जात असत. इथे दादांनी एका तृतीय पंथी व्यक्तीला स्वयंपाकी म्हणून ठेवले होते.
मेहकरला डॉक्टर वरणगावकरांचा दवाखाना गावाबाहेर होता. त्यांचा पुतण्या मोहन जो आमच्या वयाचा होता, त्यांच्याकडे रहात असे. एकदा घरी येताना वाटेत आईला विंचू चावला, तेव्हा डॉक्टर वरणगावकरांना बोलावले होते. नंतर त्यांच्याशी चांगला परिचय झाला.
१९६९ च्या उन्हाळ्यात दादांनी बुलेट मोटारसायकल विकत घेतली. त्यासाठी आम्ही सर्व अकोला येथे गेलो.
मेहकर ते अकोला महबूबमियाँच्या MM ट्रान्सपोर्ट नावाने बसेस चालत. मेहकरला पोचण्यासाठी आम्ही सांगलीहून अकोल्याला ट्रेनने जाऊन पुढे बसने जात असू. याच सुमारास ST ने रातराणी बससेवा सुरु केली. साध्या सीटच्या जागी हेडरेस्ट वाली सीट लावली. नागपूर ते पुणे रातराणी सेवा व्हाया खामगाव / मेहकर सुरु झाली. ही बस रात्री अकरा वाजता मेहकरला येत असे. जागा मिळायची खात्री नसे पण चिखली पासून जागा मिळे. देऊळगावराजा जवळ रात्री बस लुटल्या जात त्यामुळे पुण्याला किती वाजता पोहचूयाचा भरवसा नसे.
दादांची मेहकरहून यवतमाळ आणि पुन्हा मेहकरला बदली झाली. १९७१च्या दिवाळीत आम्ही सांगलीहून बिर्हाड मेहकरला शिफ्ट केले. तेव्हा मिरज पुणे लाईन ब्रॉडगेज होऊन कोल्हापूर ते नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस सुरु झाली होती. सांगली स्टेशन नवीन सुरु झाले होते. तिथे गाडी खूपच कमी थांबत असे. आमच्या तिघांचे मित्र स्टेशनवर आले आणि सामान ब्रेकव्हैन मधे चढस्तवर गाडी थांबून ठेवली. परत आल्यावर मी हॉस्टेलमधे गेलो.
१९७२ जानेवारीत भाऊ वालचंद कॉलेज मध्ये जॉईन झाला. रात्री सांगलीत पिक्चर पहायला किंवा जेवायला गेलो आणि शेवटची बस चुकली तर पायीच हॉस्टेलला जावे लागे.
दादांची बदली मेहकर हून बुलडाणाला झाली. बुलडाणा मलकापूर स्टेशनहून जवळ आहे. त्यामुळे जाणे येणे रेल्वेनेच होऊ लागले. रिझर्वेशनची बोंबच असायची.
१९७३ला मी कराडच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज गावापासून दूर नदी ओलांडून जावे लागे. ओगलेवाडी स्टेशनही दूर होते. टांगे चालायचे. बस सेवाही फारच कमी होती. बस चुकली तर चालण्याला पर्याय नव्हता. पावसाळ्यात नदी भरलेली असताना लांब फेरा मारावा लागे. पाणी कमी असताना नदीच्या पात्रातून जाता येई.
कॉलेज संपल्यावर कळवा इथे रहायला आलो. मेन रोड पासून घरापर्यंत पायवाट होती व तबेला ओलांडून जावे लागे. काही महिने NMM मधे जॉब केला. कंपनी कळवा स्टेशनला लागून होती. रोज सकाळी अर्धा तास छोट्या गल्ल्यांमधून चालत जावे लागे. संध्याकाळी तेच चालणे. ठाण्यात जेवायला गेलो तरी पायीच जावे लागे.
त्रिचीला कारखान्यात गाडी न्यायला बंदी होती. त्यामुळे गेट पासून १ किलोमीटर पायी जावे लागे. आम्ही साऊथ गेटने जात असू. सकाळी सुर्य डाव्या बाजूला असे. संध्याकाळी पुन्हा सुर्य डाव्या बाजूला असे. त्यामुळे डावा चेहरा डार्क आणि उजवा चेहरा लाईट होईल असे वाटायचे. लग्न झाल्यावर बरीच वर्षे लंचला घरी जात असू त्यामुळे दिवसभराच्या कामानिमित्त फिरण्या व्यतिरिक्त ४ किलोमीटर कंपल्सरी चालणे होते.
पण अश्या चालण्यामुळे आणि बिना रिझर्वेशन प्रवास करण्यामुळे कुठल्याही परिस्थितीत न डगमगता राहू शकलो.
आजही आम्ही जेव्हा कारने प्रवास करतो, देशातील सर्वच प्रांतात शाळकरी मुले आणि मुली जंगलातून, घाटातून पायी एका गावाहून दुसर्या गावी शाळेत जाताना दिसतात. स्कूल बस नसली तरी शाळेत जायची जिद्द आणि संधी उपलब्ध आहे हीच खरी आनंदाची बाब
Comments
Post a Comment