व्यक्ति विशेष
व्यक्ती विशेष
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. पिंडे पिंडे मतीर्भीनः असा एक श्लोक ही आहे.
आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. काही लक्षात रहातात, काहींशी मैत्री होते, काहिंशी नाती जुळतात, तर बहुतेकांना आपण विसरुन जातो, काहिंशी वैमनस्यही होते. काही गोष्टींबद्दल आपण विचार करतो , कारणमीमांसा करतो तर काही विसरायचा प्रयत्न करतो. या सगळ्यात काही लॉजिक असते का.
प्रत्येकाला बरेच प्रश्न पडत असतात. सर्व उत्तरांना निगडीत प्रश्न असतात पण सर्व प्रश्नांना सयुक्तिक आणि एकमेव उत्तर नसते. मग सर्व गोष्टींना चाकोरीत टाकायचा प्रयत्न का केला जातो.
मधे अशीच एक चर्चा कानावर आली, ज्यात घरातील लोकांच्या स्वभावाचे विश्लेषण चालले होते. घरातल्या सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात, त्यावरून कोणाचा स्वभाव नात्यातील कोणत्या व्यक्तीवर गेला आहे ह्याची चर्चा होते.
माणसाची अंगकाठी आणि वर्ण अनु्वांशिक असतो. तशाच काही सवयी, दुखणी आणि लकबी पण अनुवांशिक असतात. काही बाबतीत समाजातील एका समुदायाच्या सवयी सारख्या असतात. त्या वरुन काही म्हणीपण वापरतात, जसे देशस्थ गैरशिस्त, कंजूष कोकणस्थ/ कर्हाडे. मारवाडी, सिंधी, पंजाबी समाजांबद्दलही असे साचेबंद पुर्वग्रह असतात. तामिळनाडू मधील चेट्टीयार आणि ब्राह्मण समाजाबद्दल ही असेच पुर्वग्रह तेथील लोकांच्या मनात असतात.
शीघ्रकोपी स्वभाव ही अनुवांशिक आहे. राग आल्यावर त्याचा उद्रेक न होऊ देणे प्रयत्नानी जमते. राग अनावर होऊन अद्वातद्वा बोलण्याने अपार नुकसान होऊ शकते. प्रकृती वर जो परिणाम होतो तो वेगळा.
काही लोक जात्याच हजरजबाबी असतात. बाकी जण नंतर विचार करत रहातात की आपण काय बोलायला हवे होते. काही जण लोकांच्या नावांवरुन, गावावरुन कोट्या करण्यात तरबेज असतात, बरे तेही भावना न दुखावता सहजपणे करतात.
काही लोकांना आसपासच्या आणि परिचयातील लोकांची वंशावळ लक्षात ठेवायची हौस असते. तर काही लोकांना स्वतःचे नातेवाईक ही लक्षात रहात नाहीत. काही लोक एकदा पाहिलेला चेहरा आणि नाव दोन्ही लक्षात ठेवू शकतात, तशी दैवी देणगी त्यांना प्राप्त असते. याच बरोबर त्यांना व्यक्ती बद्दल इतर माहिती ही लक्षात असते.
आपल्या समाजात नृत्यकला शिकण्याची प्रथा प्रतिष्ठित घरांमध्ये नव्हती. पाश्चिमात्य देशात उच्चभ्रू समाजात बॉलरुम डान्स येणे आवश्यक होते. लोकनृत्यालाही प्रतिष्ठा नाही अशामुळे लोकांना नाचायला संधी उपलब्ध नाही. बर्याच लोकांना मनसोक्त नाचायला आवडते. अशा लोकांना लग्न समारंभात वरातीत नाचायला मिळते. बरेच जण बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना असतात. कुठे संदल, डफ वाजताना दिसले की भान हरवून नाचतात. आमच्या ओळखीची एक व्यक्ती चक्क टू व्हिलर थांबवून अनोळखी वरातीत नाचून घेते.
काही लोक नादिष्ट असतात. नादिष्टपणा सुद्धा अनुवांशिक असतो. एखादी गोष्ट करु नको म्हणल्यावरही ती करण्यात त्यांना आनंद मिळतो. समोरची व्यक्ती पसंत करत नाही म्हणून मुद्दाम करतात.
भीतीही अनुवांशिक आहे. पाल, झुरळं, उंदीर इत्यादी बद्दल भीती स्त्री सुलभ आहे. साधारण पणे पुरुष यांना घाबरत नाहीत. गाय, कुत्रा, मांजर यांची भीती स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसते. बंद खोली, अंधार, निर्मनुष्य जागा, पाणी, उंच ठिकाणी जायची भीती हे सगळे ठराविक लोकांमध्ये दिसून येते. काही प्रकारांची भीती वयानुसार कमी जास्त होते.
काही लोकांना जागा बदलली तर झोप येत नाही, तर काही लोक मिळेल तीथे आडवे होऊन घोरु लागतात. खुर्चीत झोप येणारे महाभागही असतात.
लहानपणी अंगठा चोखणे ही अनुवांशिक असते. तसेच कान कोरणे, नखे खाणे , बनियन किंवा कॉलर चोखणे , एकाग्रतेने काम करताना जीभ बाहेर काढणे, वाचताना गालावर हात ठेवून कोपर टेबलावर टेकणे अशा कित्येक सवयी आणि लकबी अनुवांशिक असतात.
एखाद्या व्यक्ती बाबतीत मनात असलेली खदखद, ईर्षा आणि राग व्यक्त करण्यासाठी व्यक्तीचा उल्लेख त्रुतीयपुरुषी एकवचनी करण्यात धन्य होणारे महानुभाव ही मराठीतच सापडतात. उल्लेखित व्यक्ती बहुधा नात्यातील किंवा ऑफिस मधील वरिष्ठ असते.
आईवडील, आजी आजोबा, काका, मामा, आत्या, काकू, मावशी वगैरे ज्येष्ठ मंडळींच्या सवयी, छंद लहानपणापासून जवळून पाहिल्याने त्यांचा ठसा मनावर उमटतो. आयुष्य जगण्याचे हेच परिमाण असेही वाटते. यालाच संस्कार म्हणतात. याच बरोबर काही सवयींचा तिरस्कार ही मनात घर करतो. याच मुळे अति धार्मिक कुटुंबात नास्तिक पैदा होतात.
आमच्या दादांना अत्तर, सेंट, टोप्या, वॉकिंग स्टीक्स , पादत्राणे, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख यांची हौस आणि आवड होती. नेहमीच ह्या वस्तू खरेदी करत आणि सांभाळून ठेवत. योग्य वेळ पाहून वापर ही करत. ही आवड मुलांमध्ये जाणवली नाही तरी नातवंडांमधे दिसून येते.
आमच्या लहानपणी कॉटन, सिल्क आणि वूलन असे तीनच प्रकार चे कापड असे. कॉटन चुरगळते म्हणून त्याला स्टार्च करावे लागे. धोब्याला कपडे धुवायला दिले तर स्टार्च लावून कपडे इस्त्री करून आणत असे. घरी धुतलेल्या कपड्यांना स्टार्च करून इस्त्री करणे हा मोठा प्रोसेस असे. टापटीप राहण्याची आवड असणार्यांसाठी हे करण्याची चिकाटी लागत असे.
दादांना बूट नेहमी पॉलिश केलेले आणि चमकदार आवडत. मूड आला की घरातील सर्वांचे बूट, चप्पल एकत्र करून पॉलिश करत बसत. निव्वळ चामडी नाहीत तर केनव्हास च्या बेल्ट आणि शूजचे पण पॉलिश करत. याच बरोबर ब्रासो लावून बटणं, बक्कल वगैरे पितळी गोष्टी चमकवल्या जात. त्यात किती वेळ जातोय याचेही भान नसे. म्हातारपणी सुध्दा त्यांनी हा छंद जोपासला. ह्याचा परिणाम हा झाला की मी कधीच पॉलिश करण्याच्या भानगडीत पडलो नाही. जेव्हा कधी पॉलिशवाला दिसला, त्याच्याकडून पॉलिश केले. नंतर नशीबाने इन्स्टंट पॉलिश आले .
पहिल्या महायुद्धानंतर सेफ्टी रेझर वापरात आले. अप्पांना ( दादांचे वडील ) वस्तरा वापरायची हौस होती. जुन्या हॉलीवूडच्या सिनेमात बरीच पात्रे वस्तरा वापरुन स्वतःच दाढी आणि गोटा करताना दिसत. दादांमधेही ही आवड होती. मूड झाला की वस्तर्याने दाढी करत. सेफ्टी ब्लेडला धार करायसाठी एक काचेचे उपकरण होते. वस्तर्याला धार लावायसाठी एक चामडी पट्टा होता. बाकी वेळेस हा पट्टा मुलांना शिस्त लावायच्या कामात येत असे.
बहुतांश घरात रोज व्यवस्थित देवपूजा करायची रीत असते. घरातील कर्त्या पुरुषाने सकाळी पूजा करून ऑफिसला जावे अशी अपेक्षा असते. सगळ्याच पुरुषांना पूजेची आवड असेल असे जरुरी नाही. काही जणांना मनापासून पूजा, आरती आवडते पण नेहमीच्या दगदगीत जमत नाही. काही जण निव्वळ महिला वर्गाला खूष ठेवण्यासाठी नियमित पूजा करतात.
आमच्या घरी आई रोज पूजा करत असे. आंघोळ करून व्यंकटेश स्तोत्र म्हणत ती पूजा करत असे. आईच्या पूजेत आरतीला फार महत्त्व नव्हते. दादांना साग्रसंगीत पूजा करायाची हौस होती. त्या साठी त्यांनी अभिषेक पात्र, त्याचा स्टँड आणि बाकी सर्व पूजेसाठी लागणारी साधनसामग्री घेतली होती. दादांचा ज्या दिवशी पूजेचा मुड व्हायचा त्या दिवशी ते सोवळे नेसत, पूजेची उपकरणे घासून पुसून लख्ख करत. फुलं, पंचामृत, दुर्वा वगैरे सर्व व्यवस्थित घेऊन पूजा सुरु करत. शास्त्रशुद्ध पूजेसाठी पुस्तक ही सोबत असे. आचमन, मंत्रोच्चार करुन पूजा करत. यात दिडदोन तास जात. आरती सर्वांना कंपल्सरी होती. अर्जंट काम कोणी घेऊन आला तरी पूजेत व्यत्यय आणण्याची परवानगी नव्हती.
मला पूजा करण्यात कधीच रुची नव्हती. लग्न होऊन काही वर्षानी जेव्हा थोडे मोठे घर मिळाले, तेव्हा मी पूजा करुन ऑफिसला जावे अशी अपेक्षा होती. मी सकाळी पावणेआठला घरातून निघत असे. खूपच दडपण आल्यावर मी एक दिवस आंघोळ करून किचनमध्ये नळावर देव धुतले आणि कमरेला बांधलेल्या टॉवेलने पुसले. हीला आणि तीच्या आईला हे पाहून धक्काच बसला. याहून जास्त मला जमणार नाही म्हटल्यावर त्या नंतर माझी कायम साठी सुटका झाली.
रोज आणि नैमित्तिक पूजेनंतर आरती तसेच नंतर चे मंत्रोच्चार हा बर्याच लोकांचा आवडता कार्यक्रम. दिवसानुसार कोणत्या आरत्या म्हणायच्या हेही ठरलेले असते. शब्द नीट माहित नसताना मोठ्या आवाजात आणि लय सोडून हे जेव्हा कोणी करते तेव्हा हे सर्व असह्य होते. ठाण्यात आमच्या शेजारी धोपाटे कुटुंब रहात असे. त्यांच्या घरी आरती म्हणायचा जबरदस्त उत्साह. सम/ विषम संख्यांच्या हिशोबाने आरत्या म्हणल्या जात. गणपती उत्सवात हात आणि पाय थकून जात.
पूर्वी संक्रांत, गौरीला हळदीकुंकू करायची रीत होती. घरच्या प्रतिष्ठेनुसार किती जणींना बोलवायचे हे ठरत असे. प्रत्येक सवाष्णीची खण नारळाने ओटी भरली जात असे. सोबत वाण म्हणून काही वस्तू भेट द्यायची प्रथा सुरु झाली. जसजसे खण वापरणे बंद झाले तसे खणाची जागा ब्लाऊज पीसने घेतली. बरे हे चांगले द्यावे तर तेही नाही. सर्व दुकानात देण्याघेण्यासाठी वेगळ्या प्रतीचे ब्लाऊज पीस मिळू लागले, ज्याचा ब्लाऊज कोणीच शिवणार नाही. ब्लाऊज पीसच्या जागी रुमाल आले, ज्यांचा आकार लहान होत गेला. नारळाची जागा आधी खोबर्याच्या वाटीने घेतली, नंतर तुकडा आणि आता गायब. आधी ओटीत ओंजळ भर तांदूळ घालत, तेही कमी होत आता पाचसहा तांदूळ एका पौचमधे देण्याची पद्धत आहे. पन्ह, ऊसाचा रस, आंब्याची वाटली डाळ जाऊन आता उकडलेले चणे देऊ लागले आहेत. सुरुवातीला वाण म्हणून चांगली वस्तू देत. हळूहळू कमी खर्चात काही दिल्याचे समाधान म्हणून निरुपयोगी वस्तू दिल्या जातात. कालबाह्य प्रथा का पाळल्या जातात हा मोठा प्रश्न आहे.
काही जण खूप चिकित्सक असतात. प्रत्येक विषयावर दीर्घ चर्चा करायला त्यांना आवडते. चर्चा करून ते काही निर्णय घेतील असेही नाही, पण प्रचंड उत्सुकता दाखवतात. बाल की खाल निकालना म्हणजे काय ते यांच्या कडून शिकावं.
बर्याच जणांना आपण किती बिझी आणि पॉप्युलर आहोत हे दाखवायची हौस असते. समारंभाला उशिरा पोचतात. मी व्हॉट्सऍप च्या किती ग्रुप मधे आहे आणि किती मेसेजेस मी पाहिलेले नाहीत हे सांगण्याचा ह्यांना अभिमान वाटतो. जर मेसेज पहायचे नाहीत तर ग्रुपमध्ये रहाता कशाला. अशा व्यक्ती वैयक्तिक मेसेज ही वाचत नाहीत.
हीच गोष्ट फोन कॉलच्या बाबतीत ही घडते. मोबाईल च्या जमान्यात ही काही लोक मिस्ड कॉल पहात नाहीत. काही जणांना वाटते की गरज असेल तर ती व्यक्ती पुन्हा कॉल करेल, माझे काही अडलेले नाही. पण काही जण खूप जागरुक असतात. कॉल रिटर्न करण्यात कधीच चुकत नाहीत. बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना सांगतात की फोन उचलला नाही तर पुन्हापुन्हा प्रयत्न करु नका. मी मोकळा झालो की अवश्य फोन करीन आणि अवश्य फोन करतात. मग त्यात जुनियर, सिनियर असा भेदभाव करत नाहीत.
विनम्रता हा एक विशेष गुण आहे ज्याचा सर्वसाधारण पणे अभाव असतो. जसजसे माणसाचे वय, ज्ञान वाढते आणि समाजातील तसेच नोकरीतील वरचे स्थान मिळते तसे स्वभाव विनम्र व्हावा अशी अपेक्षा असते. मी बर्याच धनाढ्य लोकांना जे कंपनीचे मालक आहेत, इतरांशी नम्रपणे वागताना आणि लोकांना मानाची वागणूक देताना पाहिले आहे. चपराशालासुद्धा अहो जाहो करतात. या उलट अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोकही भेटतात. थोडे अधिकार हातात येताच त्यांना काय करु आणि काय नको असे होते. हाताखाली काम करणाऱ्या लोकांना कसा त्रास देता येईल याचाच विचार करतात. कुठल्याही प्रसंगी बढाया आणि फुशारक्या मारत रहातात. निव्वळ त्यांच्यात अहंगंड असतो असे नाही तर त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना एक गुर्मी येते. लोकांशी उद्धटपणे वागतात.
लोक कष्ट करून, बचत करुन आपआपल्या परीने वस्तू, गाडी, घर वगैरे खरेदी करतात. कौतुकाचे चार शब्द बोलण्या ऐवजी काही जणांना नावे ठेवायला आवडते. संवेदनशीलते चा अभाव त्यांच्या मुलांमधेही दिसून येतो.
लोकांच्या रंग, अंगकाठी, व्यंग इत्यादी वरुन त्यांची टिंगल करणे, टोमणे मारणे आणि त्यांना नावे ठेवणे हा जुन्या पिढीचा आवडता छंद होता. समोरच्या व्यक्ती च्या वापरातील भाषेच्या चुका काढण्याची काही लोकांना खोड असते. ह्यातून विनोद निर्माण करायचा प्रयत्न सिनेमा, नाटक आणि स्टेज शो मधे दिसून येतो. निपुत्रिक जोडप्याला तर अजूनही बर्याच चर्चेला समोर जावे लागते. काही लोकांना तर दुसर्यांना हिणवण्यात आनंद मिळतो.
लोकांची पत्रे, कागदपत्रे चाळू/ वाचू नयेत असा शिष्टाचार आहे. आजच्या जमान्यात हे मोबाईल किंवा कॉम्प्युटर बाबतीत लागू होते. प्रवासातही असे लोक भेटतात की तुम्ही काय वाचताय हे डोकावून पहायचा प्रयत्न करत असतात. बर्याच लोकांना संधी मिळेल तेव्हा हे सर्व पहाण्याची उत्सुकता आणि खोड असते. हा स्वभाव सुद्धा अनुवांशिक आहे. काही लोकांची मजल बंद लिफाफे उघडण्यापर्यंत जाते. समोरच्याला काय वाटेल याचही भान रहात नाही किंवा पर्वाही नसते. पुन्हा वरुन त्यात काय झाले असे विचारायची पण तयारी असते.
विकत घेऊन पुस्तक, पेपर आणि मासिक वाचण्यात मजा नाही असे मानणारेही खूप असतात. प्रवासात असे लोक हमखास भेटतात. काहींना तर असे वाटते वाचायला मागून ते आपल्यावर उपकारच करत आहे. नंतर घेतलेली वस्तू कुठे पास केली हेही त्यांच्या लक्षात नसते.
काही लोकांना जेवणातील पदार्थांचे विश्लेषण करायला आवडते. पदार्थ खाणे सोडून त्यात काय काय गोष्टी घालतात, त्यामुळे काय परिणाम होतो वगैरे सांगायची हौस असते. समोरच्या व्यक्तीला काय वाटते याचा विचारही करत नाहीत. ह्या सगळ्यात हौसेने मागवलेला पदार्थ तसाच टाकला जाऊ शकतो.
काही लोकांना उगाचच येताजाता ‘गरीबी कठीण आहे' म्हणायची सवय असते. कधीही एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळताना 'गरीबी कठीण आहे' असे कौतुकाने म्हणतात. लक्ष्मी ही तथास्तु म्हणत त्यांची प्रगती होऊ देत नाही.
कोणालाही चांगले म्हणायचे नाही असा काही लोकांचा स्वभाव असतो. काही तरी खुसपट काढल्या शिवाय त्यांचे समाधान होत नाही. एरवी खूप चांगली मैत्री असल्याचा दावा करणारे मित्र/ मैत्रीणीतील दोषांचे पाढे वाचतात.
बहुतेक बायका कोणाकडे गेल्यावर आदरातिथ्य कसे झाले यावर अधिक लक्ष देतात. खायला काय बनवले, प्लेट, पेले आणि चमचे कसे होते यात जास्त लक्ष देतात. घर कसे होते, आवरलेले होते का, पाहुणे आल्यावर बाईने बाहेर येण्यासाठी किती वेळ लावला इत्यादींवर बारीक लक्ष ठेवून असतात. कशासाठी आपण भेटायला गेलो होतो आणि आपला वेळ कसा गेला याकडे दुर्लक्ष करतात.
मुळात कुठलाच स्वभाव किंवा सवय चांगला किंवा वाईट ठरवणं चुकीचे आहे. जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला वागण्याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यावर टीका करणं ठीक नाही. अर्थात एखाद्या सवयीचा प्रकृतीवर परिणाम होत असेल, तर ती बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण निव्वळ टीका करुन गैरसमज वाढतात. काही व्यक्तींना आपणच बरोबर आहोत, असा गैरसमज असतो. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रासही होतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
अर्थात समोरची व्यक्ती कशी वागते, याच्यावर टीका करण्यापेक्षा, ती अशी का वागते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याने संबंधांमध्ये कटुता निर्माण होत नाही.
Mast
ReplyDeleteInteresting observation and analysis. Examples make it real.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete