पुरुष आणि घरकाम
पुरुष आणि घरकाम
सर्वसाधारणपणे नोकरी/ व्यवसाय करुन पैसे कमावणे हे पुरुषांचे कार्यक्षेत्र किंवा कर्तव्य आणि घर सांभाळून मुलांचे संगोपन ही स्रियांची जबाबदारी अशी भावना समाजात असते. पुर्वी लग्नासाठी मुलगी पहाताना तिला स्वयंपाक येणे आवश्यक असे, त्याच बरोबर विणकाम भरतकाम वगैरे काही येते का हा हमखास प्रश्न असे. संगीत, गायन येत असेल तर दुधात साखर समजायचे. या उलट पुरुषांना घरकाम येणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे उच्चविद्याविभूषित स्त्रीकडूनही लोकांची अपेक्षा असते की तीने ऑफिस मधून थकून घरी आल्यावर किचनमध्ये उत्साहाने स्वयंपाक करावा.
एकत्र कुटुंबात पुरुषांना स्वयंपाकघरात जाण्याची गरज नव्हती. नोकरी निमित्त कोणी एकटाच बाहेरगावी गेला तर खानावळीवर किंवा घरगुती जेवणाच्या डब्यावर दिवस काढावे लागत. परिस्थिती चांगली असेल तर घरीच स्वयंपाकी ठेवत असत. ज्यांना दोन्ही पर्याय परवडत नसत किंवा उपलब्ध नसत ते स्वतःच स्वयंपाक करत. माझ्या ओळखीचे काही दाक्षिणात्य लोक ५० वर्षांपूर्वी पंजाब आणि उत्तर भारतात बदली झाल्यानंतर स्वत:च स्वयंपाक करत कारण त्यांच्या आवडीचे अन्न मिळत नसे. नंतर कंपनीने मेसची परवानगी आणि सबसिडी दिल्यावर सर्व साईटवर दोसा/ ईडली मिळू लागले. गुजरात मधील एका साईटवर तर गुजराती कुक उत्कृष्ट साऊथ इंडियन स्वयंपाक बनवित असे.
बहुतांश घरांमध्ये मुलाकडून घरकामात मदत अपेक्षित नसते. पालकांना हे कळत नाही की स्वयंपाकघरात मुलाने जीवनावश्यक गोष्टी शिकणे गरजेचे आहे. आमच्या पिढीतील काही जणांना चहापण बनवता येत नाही हे त्यांच्या बायका अभिमानाने सांगतात. त्यांना हे कळत नाही की वेळप्रसंगी नवराच त्यांची मदत करु शकतो. लॉकडाऊन मुळे आज सगळ्याच घरात पुरुषांना घरकाम करावे लागते आहे. ज्यांनी आयुष्यभर घरात कपबशी पण उचलली नाही त्यांना म्हातारपणी घरकाम करावे लागते आहे. नवरा-बायको दोघेही वर्क फ्रॉम होम करत असल्याने दोघांनाही सवय नसलेली घरातील कामे करावी लागत आहेत. परदेशात नवरा-बायको वीकेंडला घरातील सगळी कामं करतात कारण मोलकरीण परवडत नाही. आज पैसा असूनही भारतात लोकांना स्वावलंबी व्हावे लागते आहे.
आमच्या लहानपणी मासिकपाळीच्या वेळी स्रिया बाजूला बसत. स्वयंपाकघरात त्यांना प्रवेश नसे. एका सतरंजीवर किंवा जाजमावर त्या कोपऱ्यात बसून असत. त्यांचा पाण्याचा तांब्या पेला आणि ताटवाटी वेगळं असे. त्यांना न शिवता पाणी आणि जेवण दिले जाई. एकत्र कुटुंबात त्यांचे निभून जाई, पण विभक्त कुटुंबात घरातील सर्वांना त्रास होई. घरातील पुरुषावर स्वयंपाकाची जबाबदारी येत असे. स्वयंपाक येत असेल तर ठीक नाहीतर सगळ्यांचे चार दिवस हाल होत असत. बंगल्यात रहात असाल तर शेजारच्या घरातून काही मिळण्याची शक्यता नसायची आणि बहुतेक ठिकाणी ब्राह्मणांच्या खानावळी नसायच्या. आमच्या दादांना (वडील) स्वयंपाक चांगला येत असे. त्यांच्या सवडीनुसार ते धिरडे, भाजी करून आम्हाला खाऊ घालत. आईला मुलीची हौस होती पण तीन मुलगेच झाल्याने आम्ही भावंडेच तिची मदत करत असू. तिच्या देखरेखीखाली आम्ही कुकर लावत असू. पोळी ऐवजी कणकेचे दिंड कुकर मध्ये लावत असू. मी सहावी-सातवीत असताना आईने बाजूला बसणं काळानुरूप सोडले. आमच्या ठाण्याच्या घरात तेवढी जागाही नव्हती आणि घरात कायम पाहुणे असत.
अप्पा (आजोबा) आणि दादा खाण्याचे शौकीन होते. सर्व प्रकारचे पापड, कुरडया, लोणची, लाडु आणि फराळाचे प्रकार घरीच बनवले जात. सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात बनत. आई अतिशय सुगरण होती आणि तिला स्वयंपाकाची आवडही होती. मराठी ब्राह्मणी पदार्थांबरोबर पंजाबी, गुजराती, सिकेपी/ सारस्वत आणि दाक्षिणात्य पदार्थ ती शिकली. हे सर्वच पदार्थ मग ते शाकाहारी असोत की मांसाहारी ती उत्कृष्ट बनवत असे. या सर्व पदार्थांसाठी लागणारी मदत आम्ही भावंडे करत असू.
दिवाळीत दोन-तीन प्रकारचे लाडू, शंकरपाळ्या, चिरोटे, अनरसे, करंज्या असे गोड पदार्थ बनत तर दोन-तीन प्रकारच्या शेव, चिवडे, चकल्या आणि कानडी कडबोळे असे पदार्थ बनत असत. याशिवाय जेवणात श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम ही बनत.
पापड, चिरोटे वगैरेंसाठी पीठ कुटुन देणे. जात्यावर दळताना मदत करणे, चकली/ शेव साच्यातून काढून देणे. लाडू साठी रवा/ बेसन भाजणे, लाडू वळणे. पुरण आणि श्रीखंड पुरणाच्या यंत्रातून फिरवून काढणे अशी मेहनतीची कामे आम्ही करत असू. त्यामुळे आम्हा भावंडांना स्वयंपाक येतो आणि आवडीने आम्ही काही पदार्थही बनवतो.
लग्नानंतर ही गाजर हलवा/ दुधी हलवा या साठी गाजर/ दुधी किसून देतो. फ्रुट सॅलड साठी संत्री सोलणे, फळे सोलूून चिरणे अशी मदत करत आहे. आता तर गाजर/ दुधी हलवा बनवणे हे माझेच काम आहे. केक बनवणेही माझेच काम आहे. वेट ग्राईंडर आणि फूड प्रोसेसर चालवणे हेही पुरुषांनाच करायला लागते. गॅस सिलिंडर बदलणे हे सुद्धा पुरुषांना करावे लागते. त्यात वावगं काहीच नाही. नातींनाही मी बनवलेले पदार्थ हवे असतात.
आजच्या काळात जेवणाच्या बाबतीत स्वावलंबी असणे खूप आवश्यक आहे, मग तो पुरुष असो वा स्री. रोज मॅगी नूडल्स किंवा रेडीमिक्स पास्ता, पिझ्झा खाता येत नाही हे सत्य आहे
Comments
Post a Comment